Translate

Saturday 12 July 2014

दुभंग






काळाच्या ओघात घाव भरतात कदाचित 
पण दुभंग दरी ओलांडायची शामत 
त्या काळाचीही नसते बहुदा ...

काळ लावू बघतो त्या दुभंग दरीला
लिंपण, भरू लागतो तिची खोली आनंदाने 
पण या आनंदाने दरी भरू लागायची 
तर वाढत जाते ....
एक फुंकर फक्त आठवणींची 
आणि पुन्हा घुम्म दुभंग दरी ....

त्या खोलात डोकावण्याची 
हिम्मत नसते खरे तर 
ऐलतीरावर दरीच्या सुखाने सांडलेला 
ओथंब मेघ ....
पैलतीराला झाकून टाकतो अलवार 
धुकदुलाईने 

पण मग शिशिर येतो 
सुरु होते पानगळ 
ऐलतीरावर श्रावण झडून जातो ...
पैलतीराच्या सीमा मग ठळक होतात 
आणि मग डोकावलेल्या दुभंग दरीत 
उरली पानगळ निर्माल्यासकट गळून जाते ....

वाटत दोन शकलं व्हावीत देहाची 
वाटून द्यावीत दोन्हीकडे 
पण शकलं देहाची नाहीच  होत कधी
तो शाप मनाला ....

अनुजा 

फाइल




आठवणीची जुनीपुराणी हाती येते फाइल 
वीण मनाची हलके हलके उसवत जाते फाइल 

आईला बाबांनी लिहिले दूर दूर असताना 
बाबांची हळवीशी ओळख देऊन जाते फाइल 

आठवते का ताई आपण चोरुन गेलो होतो 
चित्रपटाची पिवळट  तिकिटे अजून जपते फाइल 

आजाराची खोटी चिट्ठी.. आईची स्वाक्षरी 
नंतर पडलेल्या माराच्या खुणा दावते फाइल 

पाच रुपये वाण्याला अन सात दुधाचे होते 
हिशोब आईने लिहिलेला धरून असते  फाइल 

मुंज पत्रिका लग्न पत्रिका जपलेली ती नाती 
परत एकदा तेच सोहळे जिवंत करते  फाइल 

पहिलेवहिले प्रगती पत्रक अन शेवटची डिग्री 
उडून गेल्या पिल्लांचीही साठवण होते फाईल  

आजीच्या थरथर हातानी लिहिलेली ती ओवी 
दाटुन येता पाणी डोळा धुरकट होते  फाइल

उघडुन बसते कधीकाळचा मी खजिना सौख्याचा 
जणु आजीची मऊ गोधडी बनून जाते  फाइल 

अनुजा 

काळा








एक काळा जावळाचा 
एक डोळियाचा काळा
एक आकाश झुम्बरी 
दाटे मेघीयाचा काळा 

बाकदार भुवईचा 
एक मोरपिशी काळा 
मीटझुकल्या पापणी 
एक कासाविशी काळा 

किर्र शर्वरी रानात 
गूढ घुमणारा काळा 
अमावसी रातीमध्ये 
चमचमणारा काळा 

तटीनीच्या रात्र काठी 
लहरत गूढ  काळा 
रात  सागर  किनारी 
उचंबळे हूड  काळा 

एक हरीची सानिका 
तिचा सुरमय काळा 
एक राधिका बावरी 
तिचा हरीमय काळा 

दुष्ट अनामी भीतीचा 
भयदायी मिट्ट काळा 
कधी भूताचा खेताचा
करणीचा  कुट्ट काळा 

सावलीचा सोबतीचा 
सवे चालणारा काळा 
खोल मनाच्या तळ्यात 
कधी सलणारा काळा 

ब्रम्हांडास व्यापणारा 
भव्य भीमरूपी काळा 
पृथेवर सांडणारा 
सूक्ष्म व्योमरुपी काळा 


अनुजा 

Friday 11 July 2014

हिवाळा

मान्य आहे मला,  
तुला नाही दिल मी पहिल वहिलं काही ,
तो पहिला आवेग , 
ती पहिली मिठी , 
ती स्पंदनाची अविरत धडधड 
तो हातातला उष्ण स्पर्श ज्याने तू वितळून जावस ,
मान्य आहे मला तुला नाही दिल ,
पहिला चिंब पाऊस , 
गारठलेल्या ओठांना 
माझ्या ओठांच मऊ लोकरी पांघरूण ,
रणरणल्या काहिलीला नाही झाकल 
माझ्या ओंजळीने , 
पहिल वहिलं नाहीच दिल तुला काही 
पण तुला माहितेय ?
मी  ठेवलाय माझा "एक हिवाळा " 
फक्त तुझ्या साठी राखून , 
जेव्हा पानगळ येयील 
आणि संध्याकाळ कातर होईल 
तेव्हा माझ्या मिठीत तुला नी तुलाच सगळ मिळेल 
शेवटचा आवेग , 
शेवटची मिठी , 
शेवटचा चुकता ठोका 
तुझ्यासाठी … 

शेवटचा हिवाळा राखून ठेवलाय …

अनुजा 

घनबावरे बरसले







घनबावरे बरसले ग्रीष्मातल्या दुपारी 
जणू गायली नभाने अशब्द रागदारी 

आभाळ कापराचे मग कृष्णरंग होते 
अंगांग अन धरेचे मुरली तरंग न्हाते 

सरी शुभ्र ओघवेड्या घेउन वल्लरीना
जणू तानपुरा छेडे अलवार मध्यमांना 

चमकून मग जराशी सौदामिनी कडाडे 
ठुमरी श्रवूनिया ती मन होई सूर वेडे 

ती रेशमी झुळूक मृदगंध ल्यायलेली
प्राशून मेघ सूर मल्हार गायलेली 

भिजवूनी नखशिखांत तो कृष्णमेघ हसतो 
पानावर सरींचा झूमरा लयीत घुमतो 

बरसले हे  तराणे ग्रीष्मातल्या दुपारी 
ठेवून मेघ गेले कविता नवीन अधरी


अनुजा